मलकापूरचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा खड्ड्यांत ‘बेशरम’ची झाडे लावणार!; प्रहार संघटनेचा न.प. प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी आता ‘प्रहार संघटना’ आक्रमक झाली आहे. येत्या ७ दिवसांत प्रशासनाने रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती न घेतल्यास, शहरातील खड्ड्यांमध्ये ‘बेशरमचे झाड’ लावून अनोखे ‘खड्डे नामकरण आंदोलन’ छेडण्याचा तीव्र इशारा प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे. यासंदर्भात आज, ३० जून रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले.

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील मुख्य मार्गांसह विविध अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. या खराब रस्त्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे, तर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद प्रशासनाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. प्रशासनाने तात्काळ शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांची पाहणी करावी. रस्त्यांच्या दुरुस्तीसह सर्व खड्डे येत्या ७ दिवसांच्या आत बुजवण्यात यावेत, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीवर ७ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास, प्रहार संघटनेच्या वतीने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून त्या खड्ड्यांचे नामकरण आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल, असा इशाराही प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!