अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विदर्भाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात कथित ठेका वाटपाच्या वादातून एका बड्या लोकप्रतिनिधींचे निकटवर्तीय आणि एका बांधकाम कंत्राटदारामध्ये जोरदार वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. या वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्की आणि हातापाईत झाल्याचे बोलले जात असून, या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील काही विकासकामांच्या ठेका वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे घडामोडी सुरू होत्या. याच विषयावरून एका लोकप्रतिनिधींच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा आणि शहरातील एका बांधकाम कंत्राटदाराचा आमनेसामने सामना झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, मात्र पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की झाली, अशी जोरदार चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. या कथित घटनेबाबत शहरात विविध स्तरांवर उलट-सुलट चर्चा सुरू असल्या, तरी अद्याप संबंधित दोन्ही बाजूंच्या व्यक्तींनी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. या संवेदनशील प्रकरणाबाबत पोलिसांकडूनही अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा किंवा तक्रार समोर आलेली नाही. त्यामुळे या वादाच्या वृत्ताला अजून तरी स्वतंत्रपणे पुष्टी मिळालेली नाही. या कथित राड्यानंतर शहरातील ठेका वाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे
या प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावर संबंधित लोकप्रतिनिधी, वादात अडकलेले व्यक्ती किंवा स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अधिकृत माहिती किंवा दोन्ही बाजूंकडून स्पष्टीकरण समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकणार आहे.
