अजय टप
मलकापूर, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): तालुक्यातील वडगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवत एकाच रात्रीत तब्बल तीन घरे फोडून पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरा तालुक्यातील वडगाव नवे येथील रहिवासी फिर्यादी दिनकर निनाजी भगत (वय ६० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा धक्कादायक प्रकार १० जुलैच्या रात्री उघडकीस आला. चोरट्यांनी केवळ एका घराला लक्ष्य न करता, लागोपाठ तीन घरे निशाण्यावर घेतली. चोरट्यांनी दिनकर निनाजी भगत (रा. वडगाव नवे) यांच्या घरात प्रवेश. सविता नारायण राखोंडे (रा. वडगाव दीधी नवे) यांच्या घरात चोरी. गजानन महादेव बोदवडे (रा. वडगाव जुने) यांच्याही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली. तिन्ही घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने, अंदाजे किंमत ४३ हजार रुपये, रोख रक्कम १५ हजार रुपये, असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिनकर भगत यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ पावले उचलत अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रघुनाथ जाधव हे करीत आहेत.
