अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण आणि बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन-तीन दिवसांत विविध गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत. यामध्ये रात्रीच्या सुमारास झालेली घरफोडी, रस्त्यावरील क्षुल्लक वादातून महिलांना झालेली मारहाण आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन महिला, एक लहान मूल व एका तरुणासह एकूण ४ जण बेपत्ता झाल्याच्या घटनांचा समावेश आहे. पोलीस या सर्व प्रकरणांचा कसून तपास करत आहेत.
मलकापुरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
मलकापूर: शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ९ जुलै रोजी दुपारी १.३५ वाजताच्या सुमारास आईसोबत बँक खाते उघडण्यासाठी आलेली एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. बँकेचा फॉर्म भरल्यानंतर फोटो चिकटवण्यासाठी डिंक आणायला जाते असे सांगून बाहेर पडलेली ही मुलगी परत आलीच नाही. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. तिला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचा संशय असून मलकापूर शहर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत झेंडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ड्युटीवर गेलेला ३० वर्षीय तरुण बेपत्ता
मलकापूर: येथील पंतनगर भागातून ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ येथे ड्युटीवर जाण्यासाठी टिफिन घेऊन निघालेला ३० वर्षीय तरुण अद्याप घरी परतलेला नाही. भुसावळ रेल्वे स्टेशन येथील कार्यालयात चौकशी केली असता तो ड्युटीवर आलाच नसल्याचे समजले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पोलीस हवालदार चंद्रकांत शिंदे पुढील तपास करत आहेत.
पतीसोबतच्या वादानंतर विवाहिता ३ वर्षांच्या मुलासह बेपत्ता
बुलढाणा: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदुळवाडी येथून १० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक ३० वर्षीय विवाहित महिला तिच्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या ३ वर्षांच्या चिमुरड्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली आहे. परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांत मिसिंग नोंदवण्यात आली असून पोलीस हवालदार गजानन काकडे पुढील तपास करत आहेत.
वडगाव येथे एकाच रात्री तीन घरे फोडली; ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास
मलकापूर: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव (नवे व जुने) परिसरात १० जुलैच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घरांमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने (किंमत ४३ हजार रुपये) आणि रोख १५ हजार रुपये असा एकुण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दिनकर भगत यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रघुनाथ जाधव या गुन्ह्याचा तपास करत असून यामध्ये अत्याधुनिक ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
रस्त्यावर रेती टाकण्याच्या वादातून तरुणीसह आई-बहिणीला मारहाण
मलकापूर: ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या उमाळी गावात ९ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास रस्त्यावर रेती टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका १९ वर्षीय तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. घरासमोरील रस्त्यावर टाकलेल्या रेतीवरून किराणा आणायला जात असताना तेथील काही स्थानिक रहिवाशांनी “आमच्या जागेतून का जाता, रेती पसरते” असे म्हणत वाद घातला. त्यानंतर तरुणीला धमकी देऊन वीट फेकून मारण्यात आली, तसेच तिची आई व बहीण मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता तीन आरोपींनी मिळून त्यांना चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे उमाळी येथील तीन संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून एएसआय बाळू टाकरखेडे पुढील तपास करत आहेत.
