बुलढाण्यात खाकीचा दणका! सिद्धेश्वर मंदिरातील चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; एलसीबीने आवळल्या चोरट्याच्या मुसक्या!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सिद्धेश्वर महादेव मंदिर चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. देवाच्या घरावर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या सुपरफास्ट आणि धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात तीव्र खळबळ उडाली आहे.

१६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ च्या दरम्यान, कऱ्हाळे ले-आऊट येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात एका अज्ञात चोरट्याने डल्ला मारला होता. मंदिरातील देवाचे चांदीचे अवयव आणि मौल्यवान पितळी-तांब्याचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवित्र मंदिरातील चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. दरम्यान, एलसीबीच्या चतुर सळसळत्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी आकाश शिवरतन बाहेती (वय ५० वर्षे, रा. पवार ले-आऊट, सोळंकी हॉस्पिटलच्या मागे, बुलढाणा) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून मंदिरातून चोरीला गेलेला १८ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चांदीचे ४ डोळे आणि नाक (किंमत १० हजार रुपये), तांब्याची दोन लहान-मोठी भांडी (किंमत ६ हजार ५० रुपये), पितळी समई (किंमत २ हजार रुपये), पितळी नंदादीप (किंमत ३०० रुपये) चा समावेश आहे. सदरची धडाकेबाज कामगिरी बुलढाणा पोलीस अधीक्षक नीलेश राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद यांच्या पथकाने बजावली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बुलढाणा शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!