अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये धुपेश्वर येथे नदीत बुडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, बनावट बस पास वापरून फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणावर बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरुड येथे दारूच्या नशेत मुलाने वडिलांवर हल्ला केल्याची घटना घडली असून, साखरखेर्डा व जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
धुपेश्वरच्या पूर्णा नदीत बुडून ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
एमआयडीसी मलकापूर: मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे पूर्णा नदीच्या पात्रात बुडून एका ६० वर्षीय वृद्धाचा (रा.कुलमखेड) दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी पहाटे देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले होते. सकाळी नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. तेथील कपड्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. धार्मिक वृत्तीचे असलेले हे वृद्ध देवदर्शनापूर्वी नदीत स्नानासाठी उतरले असता तोल जाऊन बुडाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी एमआयडीसी दसरखेड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार राजेश बावणे हे करत आहेत.
बनावट बस पास वापरून प्रवाशाची फसवणूक
बोराखेडी: मोताळा ते मोताळा फाटा दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करताना बनावट बस पास वापरल्याचे उघडकीस आले आहे. भुसावळ-मेहकर बस क्रमांक एमएच-४०-एन-९८७६ च्या वाहकाने संशय आल्याने पासची तपासणी केली असता पास बनावट असल्याचे आढळले. बोराखेडी येथील २३ वर्षीय प्रवाशाने जून महिन्यात इश्यू झालेल्या ७०० रुपयांच्या बस पासवर छेडछाड करून तारीख (१३ जुलै ते ११ ऑगस्ट २०२६) बदलली व त्याची कलर प्रिंट काढून प्रवास करत असल्याचे नियंत्रकांच्या तपासणीत स्पष्ट झाले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूच्या नशेत मुलाचा वडिलांवर दगडाने हल्ला
धाड: वरुड (ता. जि. बुलढाणा) येथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या मुलाने स्वतःच्या ६२ वर्षीय वडिलांवर दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. शेतातून घरी आलेल्या वडिलांनी दारू पिऊन आलेल्या मुलाला शिवीगाळ न करण्यास सांगितले व घरात न घेण्याचा इशारा दिला. याचा राग येऊन आरोपी संदीप बोराडे याने हातात दगड घेऊन वडिलांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन २१ वर्षीय युवती बेपत्ता
साखरखेर्डा: २० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी महाविद्यालयातून टीसी आणण्यासाठी जाते असे सांगून घरून निघाली, मात्र ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेऊनही ती न आढळल्याने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मिसींग दाखल करण्यात आली आहे.
जळगाव जामोद: जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडशिंगी येथील २१ वर्षीय युवती २० जुलै रोजी सकाळी ९ वाजता आसलगाव येथे मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाते असे सांगून गेली होती. ती अद्याप घरी न परतल्याने जळगाव जामोद पोलिसांत मिसींग नोंदवण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांत पोलीस पथके पुढील तपास करत आहेत.
