धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):गेल्या आठवड्यात गठित करण्यात आलेल्या धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने अत्यंत तत्परता आणि चाणाक्षपणा दाखवत धामणगाव येथील गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या दोन तासांत उकल केली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत त्याच्याकडून चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करून आपल्या एक्सप्रेस कारवाईची चुणूक दाखवून दिली.

मंदिरातील दानपेटी चोरीचा अवघ्या २ तासांत छडा; शंभर टक्के मुद्देमाल जप्त; धाड पोलिसांचा ‘सुपरफास्ट’ तपास!
धामणगाव (ता. जि. बुलढाणा) येथील गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरात चोरट्याने डल्ला मारत लोखंडी दानपेटीसह रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी फिर्यादी समाधान छगन पायधन (वय ५९ वर्षे) रा. धामणगाव यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार युवराज मुळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांचा सहभाग असलेल्या गुन्हेशोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. संशयावरून निलेश गणेश माहाले (वय ३३ वर्षे) रा. धामणगाव याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या आरोप पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यातील लोखंडी दानपेटी (किंमत १ हजार ५०० रुपये), पेटीतील रोख रक्कम (६ हजार रुपये), असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यामुळे अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल झाली. धाड पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसर आणि मंदिर संस्थानात समाधानाचे वातावरण असून, चोरट्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.