दहा लाखांची सायबर फसवणूक, अंधश्रद्धा, बालविवाह, पोक्सो अन् चोरीच्या घटनांनी जिल्हा हादरला; विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे नोंद

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण, नांदुरा, धामणगाव बढे आणि बोराखेडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लाखो रुपयांची सायबर फसवणूक, अंधश्रद्धेतून जादूटोणा करणे, अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून गरोदर ठेवणे, लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, एसटी प्रवासात दागिन्यांची चोरी, आत्महत्येची घटना तसेच दोन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाने सर्व घटनांची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली १० लाख ७१ हजारांची सायबर फसवणूक 

जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील ६१ वर्षीय शेतकरी राजेशकुमार भीकमचंद केला यांची इंटरनेटद्वारे मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी हे फेसबुक पाहत असताना त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये कमी गुंतवणुकीत जास्त परतावा देण्याबाबतची एक जाहिरात दिसली. त्यावरील लिंकवर क्लिक केले असता, एका अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकावरून ‘सुनील कुमार’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. झालेल्या नुकसानीची सर्व भरपाई देण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून टप्प्याटप्प्याने तब्बल १० लाख ७१ हजार ४५३ रुपये उकळले. कोणताही मोबदला न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीनंतर हा गुन्हा सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला असून, ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांविरुद्ध आयटी ॲक्ट कलम ६६(सी), ६६(डी) सह बीएनएस कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

घरासमोर जादूटोण्याचे साहित्य ठेवून भीती घालण्याचा प्रकार

जळगाव जामोद: झाडेगाव (ता. जळगाव जामोद) येथे अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाडेगाव येथील ५० वर्षीय शेतकरी लालशहा युनुस शहा यांच्या घराच्या दरवाजासमोर गावातीलच महादेव लक्ष्मण पांडे (वय ५० वर्षे) याने जादूटोणा करण्याच्या उद्देशाने नागवेलीचे पान, कुंकू, हळद, गुलाल, बिबा, लिंबू आणि त्यामध्ये ७ ते ८ लोखंडी सुया असे साहित्य आणून ठेवले. आपल्यावर व आपल्या कुटुंबावर जादूटोणा करून भीती निर्माण करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे लक्षात येताच लालशहा शहा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून आरोपी महादेव पांडे याच्याविरोधात महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अतुल मोहाळे करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह, लैंगिक शोषण अन् बाळाचा जन्म

धामणगाव बढे: धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह आणि पोक्सो कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. फर्दापूर (ता.मोताळा) येथील पवन भाऊराव ससाणे याने एका १७ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्ण कल्पना असतानाही आरोपीचे आई-वडील आणि मध्यस्थ महिला, अशा सर्वांनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर पवन ससाणे याने मुलीवर वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले. पीडित मुलीने सामान्य स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे एका मुलाला जन्म दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील आणि पोलीस अंमलदार विठ्ठल कोल्हे यांच्या माध्यमातून पीडितेचा जवाब नोंदवण्यात आला. याप्रकरणी पती पवन ससाणे, सासरे भाऊराव ससाणे, सासू रेखा ससाणे (सर्व रा. फर्दापूर) व मध्यस्थ सुधंधी मोग्या वाडिया (रा. भैसदेल, मध्य प्रदेश) या ४ आरोपींविरोधात बीएनएस कलम ६४(१), ६४(२)(एम), ३(५), पोक्सो कलम ४, ६ सह बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

मलकापूर शहर: रामदेव बाबा नगर, मलकापूर येथील ३८ वर्षीय मजुरी करणाऱ्या महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

रामदेव बाबा नगरात राहणाऱ्या आकाश राजू टाक (वय ३५ वर्षे) याने पीडित महिलेला नोकरी लावून देण्याचे, स्वतःच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. पीडितेने तीव्र विरोध केला असता तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनी महिला अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. ही बाब आरोपीला सांगताच त्याने अचानक पवित्रा बदलून लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. “हे मूल माझे नाही” असे सांगून चारित्र्यावर संशय घेतला, शिवीगाळ केली अन् पैसे देण्याचे आमिष दाखवले. पीडितेने पैसे नाकारताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ६९, ३५६(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रशांत झेंडगे करत आहेत.

बालकावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक

बोराखेडी: बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बालकावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी दाखल गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ (बीएनएस कलम ६४, ६४(२)(m) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ३, ४) मधील आरोपी गोपाळ गजानन राठोड (वय २७, रा. कवळगाव, ता. खामगाव) यास पोउपनि राजेंद्र कपले यांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत बंद आहे.

एसटी प्रवासात बॅगेतून ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

मलकापूर शहर: खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील रहिवासी अर्चना मधुकर उगळे (वय ४४) या शिर्डी ते धुळे बसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेले. नांदुरा पुलाजवळ (लक्ष्मीनगर, मलकापूर) प्रवास सुरू असताना बॅगेत ठेवलेली २ ग्रॅम वजनाची सोन्याची पॉलिश पट्टी पोत (किंमत २० रुपये) आणि ४ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके (किंमत ४० रुपये), असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अज्ञात चोरट्याने प्रवासादरम्यान हातसाफ केली असून, अर्चना उगळे यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार चंद्रकांत शिंदे पुढील तपास करत आहेत.

खामखेड रेल्वे परिसरात अज्ञात इसमाची आत्महत्या

मलकापूर ग्रामीण: मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खामखेड रेल्वे स्टेशन परिसरात (कि.मी. ४८६/१३१५ अप लाईन) एका अनोळखी पुरुषाने धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

रेल्वेचे ट्रकमन समाधान भगवान पंडित यांनी या घटनेबाबत उप स्टेशन प्रबंधक कार्यालय मलकापूर येथे मेमो सादर केला. या मेमोच्या आधारे मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मर्ग क्रमांक २२/२०२६ (कलम १९४ बीएनएसएस) अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ३८ ते ४० वर्षे असून, पदवीधर पोलीस अंमलदार सुभाष सरकटे हे मृतदेहाची ओळख पटवण्याचा व पुढील कायदेशीर कारवाईचा तपास करत आहेत.

नांदुरा येथून १५ वर्षीय मुलगी बेपत्ता

नांदुरा: नांदुरा शहरातील नागलकर नगर येथील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडल्यानंतर परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाते असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, ती वेळेवर शाळेतून घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिच्या मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे आणि संपूर्ण परिसरात शोध घेतला, परंतु ती आढळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय तिचे वडील विजय लांजुळकर यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विलास थुल मुलीचा शोध घेत आहेत.

धानोरा येथून महाविद्यालयीन युवती गायब

मलकापूर ग्रामीण: धानोरा (ता. नांदुरा) येथील रहिवासी राजेंद्र रायभान धाडे यांची १९ वर्षीय मुलगी (बी.ए. द्वितीय वर्ष) घरी कोणालाही काही न सांगता अचानक निघून गेली आहे. निघून जाताना ती आपली सर्व महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन गेली आहे. मुलीचा नातेवाईक, गाव व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही कोणतीही माहिती न मिळाल्याने तिच्या वडिलांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग नोंद केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार पंकज वराडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!