अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील धाड, मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण आणि धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मासरूळ येथील परस्परविरोधी मारहाण, १.९० लाखांची वीज वाहिनी चोरी, घरगुती हिंसाचार, बेकायदेशीर जुगार व दारू विक्री तसेच बेपत्ता युवतीच्या घटनांचा समावेश आहे.
धाड: मासरूळ येथील अर्जुन किसन महाले (वय ६५ वर्षे ) हे घरासमोर बसलेले असताना दीपक गजानन महाले याने दारूसाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने दीपक याने घरातून कुऱ्हाड आणून अर्जुन महाले यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच नागराज, गजानन व शशिकला महाले यांनी मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणी धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र चव्हाण हे करत आहेत. तर शशिकला गजानन महाले (वय ४०, रा. मासरूळ) यांच्या तक्रारीवरून अनिल अर्जुन महाले, निलेश अर्जुन महाले, भारती अनिल महाले व अर्जुन किसन महाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गावातील वाद सोडवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा न आल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे पती, मुलगा व सुनेला फायटर, काठी आणि चाकूने मारहाण केली.
मलकापूर शहर: चारखंबा चौकात लाकूड खरेदी-विक्रीचे पैसे मागितल्याच्या वादातून आरोपी मोहम्मद अबुजर, मोहम्मद अरबाज, मोहम्मद अमान आणि मोहम्मद वसीम यांनी मोहम्मद शाहरुख मोहम्मद अब्दुल (वय ३० वर्षे ) यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी मोहम्मद अरबाज याने लोखंडी असारीने पाठीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तपास पोहेकॉ चंद्रकांत शिंदे करत आहेत.
मलकापूर शहर: सिद्धिविनायक नगर येथे मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोन पाहिल्यावरून झालेल्या वादातून पती ईश्वर अशोक मेसरे याने पत्नी माधुरी मेसरे (वय ३२ वर्षे ) यांना शिवीगाळ करत कमरेच्या बेल्टने हातावर, पाठीवर व पायावर बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले हे करत आहेत.
मलकापूर शहर: बसस्थानकामागे हनुमान नगर रोडवर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळवणारा आरोपी सुनील रमेश खंडारे (वय ३२ वर्षे) रा. दाताळा याच्यावर पोलिसांनी छापा टाकून ३१० रुपये नगदी, मटका चिठ्ठी व पेन जप्त केला. महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास पोलीस अंमलदार अमोल शेले करत आहेत.
मलकापूर शहर: रेल्वे स्टेशनकडून तहसील चौकाकडे दारूच्या नशेत अनियंत्रित रीतीने स्प्लिंडर मोटरसायकल एमएच-२८-एसी-९१६० चालवताना आरोपी श्रीकांत पांडुरंग पारधी (वय २४ वर्षे) रा. विटाळी धानोरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत दारूची प्राशन केल्याचे सिद्ध झाल्याने मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलीस अंमलदार महेश चोपडे करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: वाघुळ व वडोदा शिवारातील महावितरणच्या शेतीपंप वाहिनीचे २३ गाळे (किंमत १ लाख ९० हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ अमोल सावळे यांच्या तक्रारीवरून भारतीय विद्युत कायदा कलम १३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रघुनाथ जाधव हे करत आहेत.
खामखेड: येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी भास्कर दिनकर मुंढे (वय ५० वर्षे) याच्या ताब्यातून ५०० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून जागेवर नष्ट करण्यात आली. याप्रकारणी उपरोक्त आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुभाष सरकटे करत आहेत.
धामणगाव बढे: माकोडी (ता. मोताळा) येथील १८ वर्षे ८ महिने वयाची युवती १९ ऑगस्ट रोजी आजीला डबा देण्यासाठी जाते असे सांगून घरून निघाली ती परत आलीच नाही. नातेवाइकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या माहितीवरून धामणगाव बढे पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात केली आहे. तपास पोलीस अंमलदार गजानन भराड हे करत आहेत.
