अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूरमधील कोलते कॉलेजजवळ २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास एका इसमाने अचानक धुमाकूळ घालत राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसची तोडफोड केली. या घटनेत बस चालकाला मारहाण करण्यात आली असून, महामंडळाचे तब्बल ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिंचोल, ह.मु. म्हाडा कॉलनी, (मलकापूर) येथील राहीवाशी आरोपी संजय भगवान गवई (वय ४० वर्षे) याने झोडगा ते मलकापूर बस क्रमांक एमएच-१४-बीटी-३३२४ ला आपली मोटारसायकल आडवी लावून रस्ता अडवला. कसलेही कारण नसताना दहशत पसरवण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हातातल्या काठीने बसची समोरची व बाजूच्या दोन काचा फोडून ४० हजार रूपयांचे नुकसान केले. जाब विचारणाऱ्या चालक संजय कांबे (वय ३२ वर्षे) यांच्या पायावर काठीने मारहाण केली आणि वाहक संदीप देशमुख यांना लोटपाट करत “पुन्हा या रस्त्याने बस आणल्यास जीवाने मारेन” अशी धमकी दिली. तर दुसऱ्या शेगाव ते शिर्डी जाणाऱ्या बस क्रमांक एमएच-१४-एलएक्स-४४६४ वरही हल्ला केला. याच दरम्यान खामगाव आगाराची बस मुक्ताईनगरकडे जात असताना आरोपीने ती गाडीही अडवली आणि काठीने समोरची काच फोडून ४५ हजार रुपयांचे नुकसान केले.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी संजय गवईविरोधात बीएनएसच्या विविध कलमांसह, गुन्हेगारी कायदा सुधारणा अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
