अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३ सप्टेंबर रोजी विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये सायबर फसवणुकीत ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक, अवैध वाळू वाहतूक, वाहन चोरी, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मारहाण तसेच फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ३२.९० लाखांची फसवणूक
बुलडाणा: सायबर पोलीस ठाणे बुलढाणा येथे ७० वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची तब्बल ३२ लाख ९० हजार ४०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शेलूद येथील प्रल्हाद चिंतामण पवार यांना अज्ञात आरोपींनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून आपण एनएआय मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यांच्या बँक खात्यात संशयित व्यवहार झाल्याचे तसेच मनी लाँड्रिंग व बनावट बँक खाते उघडण्यासंदर्भात गुन्हा दाखल असल्याचे सांगून अटक करण्याची भीती दाखविण्यात आली.
यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्यास भाग पाडून आरोपींनी ही रक्कम हडप केली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे करीत आहेत.
विना नंबर ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक
एमआयडीसी मलकापूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीत अग्रवाल पॅकर्ससमोर राष्ट्रीय महामार्ग-५३ वर विना नंबर ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर चालकाने पोलिसांचा इशारा न जुमानता ट्रॅक्टर थांबविला नाही. त्याने ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर खाली करून तेथून पळ काढला. या कारवाईत सुमारे ८ लाख रुपयांचा विना नंबर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि १० हजार रुपयांची एक ब्रास वाळू, असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अजय पाटील (रा. सालबर्डी, मुक्ताईनगर) व स्वप्नील कैलास जुमळे (वय २६, रा. अहिल्यादेवी नगर, मुक्ताईनगर) यांची नावे समोर आली आहेत.
मलकापुरात दुचाकी चोरी
मलकापूर: शहरातील साई अपार्टमेंट परिसरातून अज्ञात चोरट्याने ड्रीम युगा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. या दुचाकीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. २५ ऑगस्टच्या रात्रीपासून २६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
मलकापूर शहर: पोलिसांनी तहसील चौक परिसरात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई केली. एका प्रकरणात गणेश नामदेव झनंके याला मोटारसायकल वेडीवाकडी व अनियंत्रितपणे चालविताना पकडण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या प्रकरणात इसुफ खान दिलावर खान हा प्लेझर स्कुटीवरून अनियंत्रितपणे वाहन चालविताना आढळला. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही प्रकरणांत मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध देशी दारू जप्त
रायपूर: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरपूर शिवारात पोलिसांनी कारवाई करून देशी दारूच्या १८० मिलीच्या सहा सीलबंद बाटल्या, एकूण ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नंदकिशोर विठ्ठल लेंभे (वय ३८, रा. शिरपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टरच्या व्यवहारातून फसवणूक
नांदुरा: पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला ट्रॅक्टर घेतल्यानंतर कामे मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर आरोपीच्या जागेवर उभा करून फिर्यादीला कोणतीही कल्पना न देता तो दुसऱ्या व्यक्तीस विकल्याचा आरोप आहे.
शेतातील औषध फवारणीच्या वादातून मारहाण
मलकापूर शहर: पोलीस ठाण्यात कुलमखेड येथे शेतातील औषध फवारणीच्या कारणावरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फवारणीमुळे मुलगा व वडिलांना उलट्या होत असल्याचे सांगितल्याने झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून काठीने डोक्यात मारहाण केली. तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विषारी औषध प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू
धाड आणि मलकापूर ग्रामीण: पोलीस ठाण्यांत विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याच्या दोन स्वतंत्र घटनांची नोंद करण्यात आली. जामठी येथील शरद नारायण तायडे (वय ३९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वडजी येथील सुनील शरदचंद्र बोंडे (वय ४१) हे घराच्या दरवाजात मृतावस्थेत आढळून आले. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मलकापूरमधून २४ वर्षीय युवक बेपत्ता
मलकापूर: शहरातील राजमोहल्ला, पारपेठ येथील शोयेब खान भिकन खान (वय २४) हा १ सप्टेंबर रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला. नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने 3 सप्टेंबर रोजी पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी सायबर फसवणुकीच्या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीने फोनवरून अटक किंवा चौकशीची भीती दाखवून पैसे मागितल्यास घाबरून पैसे पाठवू नयेत, तसेच तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
