विशेष ग्रामसभेत राडा! ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): तालुक्यातील निंबारी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत एका शासकीय अधिकाऱ्याला अत्यंत हीन दर्जाची अश्लील शिवीगाळ करून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत, “गावात आलास तर उभ्याने कापून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात आणि विशेषतः प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी दिपक विलास ठाकुर (वय ४३ वर्षे) हे गटविकास अधिकारी (मलकापूर) यांच्या लेखी आदेशान्वये ३१ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यासाठी उपस्थित होते. ग्रामसभा सुरू होऊन शासकीय कामकाजाची प्रक्रिया सुरू असतानाच गावातीलच रहिवासी असलेले आरोपी सतेंद्रसिंग छत्रपालसिंग राजपुत हे अचानक त्या ठिकाणी आले. त्यांनी सभेत गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा आणि बंद असलेल्या हातपंपाचा मुद्दा उपस्थित केला. “गावातील हातपंप बंद असून दररोज पाणीपुरवठा सुरू ठेवा,” अशी मागणी करत त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ठाकुर यांनी शासकीय नियमांनुसार आणि शांततेच्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी सतेंद्रसिंग राजपूत यांचा पारा चढला. त्यांनी सर्व ग्रामस्थांदेखत शासकीय अधिकाऱ्याला उद्देशून अत्यंत अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता गावात पुन्हा पाऊल ठेवलेस तर तुला उभ्याने कापून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या हुज्जत आणि धमकीमुळे शासकीय ग्रामसभेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. शासकीय कर्तव्य बजावत असताना झालेल्या या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि जिवाला धोका निर्माण झाल्याने ग्रामपंचायत अधिकारी दिपक विलास ठाकुर यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम कलम २२१, २९६, ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे करत आहेत.

प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप

ग्रामपंचायत अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी जेव्हा शासनाच्या योजना आणि आदेश घेऊन जनतेच्या दारात जातात, तेव्हा त्यांना अशा प्रकारे स्थानिक राजकारणाचा किंवा व्यक्तिगत रोषाचा सामना करावा लागत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यावर भरदिवसा, सार्वजनिक ठिकाणी आणि तेही थेट जिल्हा परिषद शाळेत शासकीय सभा सुरू असताना झालेला हा हल्ला म्हणजे कायद्याचा धाक उरला नसल्याचे लक्षण आहे, अशी चर्चा सध्या मलकापूर तालुक्यात सुरू आहे. आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!