अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सध्या राज्यभरात बेकायदेशीर बाबींवर कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र,”महाराष्ट्रात मुंडे पॅटर्नचा सपाटा सुरू असताना,विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहराला अशा धडक कारवाईची प्रतीक्षा कधी संपणार?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था आणि औषध विक्री दुकानांमध्ये (मेडिकल्स) सध्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
आरोग्य यंत्रणा रामभरोसे: नामवंत रुग्णालयांत ‘विना-पदवीधारक’ नर्सचा सुळसुळाट!
मलकापूर शहरात गल्लोगल्ली खाजगी दवाखाने आणि भव्य रुग्णालये थाटली गेली आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका या मान्यताप्राप्त संस्थेतून ए एन एम, जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग ची पदवी घेतलेल्या आणि ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’कडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. मलकापूरमधील अनेक दवाखान्यांमध्ये अवघ्या काही हजारांच्या पगारावर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसलेल्या, अप्रशिक्षित मुली आणि महिलांना ‘नर्स’ म्हणून कामावर ठेवले गेले आहे. त्यांच्याकडून सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, आणि गंभीर रुग्णांची देखभाल करणे,ईसीजी काढणे इतकेच नव्हे तर अतिदक्षता विभागातही काम करणे यांसारखी संवेदनशील कामे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात आहेत. यामुळे रुग्णांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
मेडिकल स्टोअर्समध्ये ‘फार्मासिस्ट’ गायब; चालकांकडूनच औषधांची खैरात!
तर दुसरीकडे, शहरातील औषध दुकानांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे.औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार,कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट हजर असणे आणि त्याच्याच देखरेखीखाली औषध विक्री होणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. “मलकापूरमधील अनेक नामांकित आणि छोट्या मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट केवळ कागदावरच आहेत. प्रत्यक्ष दुकानात मात्र औषधांची कोणतीही जाण नसलेले चालक किंवा मुले सर्रासपणे डॉक्टरांच्या चिठ्ठ्या वाचून औषधे देत आहेत. मात्र रुग्णाला “चुकीचे औषध दिल्यामुळे रुग्णाचे काय हाल होऊ शकतात, याची साधी जाणीवही या दुकानदारांना व प्रशासनाला नसल्याचे दिसते.
मलकापूरकरांचा सवाल: प्रशासन झोपले आहे की डोळेझाक करत आहे…
तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या सपाट्यामुळे राज्यातील अनेक भागांतील आरोग्य माफियांचे धाबे दणाणले आहेत. मग मलकापूरचे आरोग्य प्रशासन आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) विभाग अद्याप सुस्त का आहे.. शहरातील प्रत्येक खाजगी रुग्णालयाची अचानक तपासणी करून तिथल्या नर्स स्टाफच्या पदव्यांची पडताळणी करण्यात यावी.तसेच प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये फार्मासिस्ट हजर असतो की नाही,याची बायोमेट्रिक किंवा अचानक तपासणी मोहीम राबवण्यात यावी.तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर आणि मेडिकल मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. मलकापूर शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटवर ‘तुकाराम मुंडे स्टाईल’ धडक कारवाई कधी होणार,की प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
