अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): चुकीच्या व अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर संशय व्यक्त करत, मंगला गणतिरे यांना देण्यात आलेले जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी पंंतनगर (मलकापूर) येथील शिल्पा सतीश नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज, १७ ऑगस्ट रोजी अध्यक्ष/सदस्य सचिव, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (बुलढाणा) यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अध्यक्ष/सदस्य सचिव, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (बुलढाणा) यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मंगला गणतिरे यांना जात वैधता प्रमाणपत्र कोणत्या पुराव्यांच्या व कागदपत्रांच्या आधारे देण्यात आले, याचे मूळ प्रकरण मागवून समितीने त्याची पुनरतपासणी करावी. नियमानुसार आवश्यक असणारा १९५० पूर्वीचा जात दर्शवणारा वैध पुरावा सादर केला गेला आहे का, याची सखोल खातरजमा केली जावी. १९५० पूर्वीच्या शाळा सोडल्याचे दाखले, महसूल नोंदी, जन्म-मृत्यू रजिस्टर व इतर शासकीय अभिलेखांची मूळ नोंदींशी प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी पूर्ण होईपर्यंत मंगला गणतिरे यांना सदर ‘व्हॅलिडिटी’च्या आधारे कोणत्याही नवीन सवलती, आरक्षण किंवा शासकीय लाभांचा दावा करण्यापासून रोखावे आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. अपुऱ्या दस्तावेजांच्या आधारे वैधता प्रमाणपत्र दिले गेले असल्यास ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी देखील शिल्पा नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीतून केली आहे. या अर्जाची गंभीर दखल घेत बुलढाणा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती काय पावले उचलते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी कशी करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
